पुणे (Pune News): महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या राज्यस्तरीय ५१ व्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महामंडळाची कार्यकारिणी सभा जिमखाना मैदान सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे पार पडली. या सभेस महामंडळ पदाधिकारी व राज्यामधील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्यवाह व सेवक प्रतिनिधी उपस्थित होते. महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने (सातारा), कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर (चंद्रपूर ), सरकार्यवाह शिवाजी खांडेकर (पुणे ), सर्व उपाध्यक्ष, विभागीय कार्यवाह, प्रसिद्धी प्रमुख व अंतर्गत हिशोब तपासणीस यांच्या उपस्थितीमध्ये कंद सुखदेव यांची निवड करण्यात आली.
नोव्हेंबर २०२३ मध्ये पुणे येथे महामंडळाची त्रैवार्षिक निवडणूक झाली होती. त्यामध्ये 18 पैकी शिवाजी खांडेकर यांच्या पॅनलचे 14 पदाधिकारी बिनविरोध व उर्वरित 4 मतदान होऊन विजयी झाले होते. शिवाजी खांडेकर यांची सलग चौथ्यांदा महामंडळंच्या सरकार्यवाहपदी निवड झाली होती. ज्या जिल्ह्याकडे सरकार्यवाह पद असते त्याच जिल्ह्यामधून महामंडळाच्या कोषाध्यक्षपद सरकार्यवाह हे निवड करत असतात. शिवाजी खांडेकर यांनी सुखदेव कंद यांना सलग चौथ्यांदा संधी दिली आहे. सुखदेव कंद हे ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय कुंजीरवाडी, तालुका हवेली येथे गेली 30 वर्षे वरिष्ठ लिपिक पदावर सेवा करत आहे. त्यांच्या निवडी बद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण घुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना मुखवटे व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.