पुणे : पुण्यात सोशल मिडीयावर झालेली ओळख एका परिचारिकेला चांगलीच महागात पडली आहे. तिची ध्वनिचित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन परिचारिकेला खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आहे. त्या पतीपासून विभक्त झाल्या आहेत. आरोपीने अमनप्रीत सिंग या नावाने सोशल मिडीयावर अकाउंट सुरु केलं. त्यानंतर चोरट्याने परिचारिकेला मैत्रीची विनंती() पाठविली होती. लंडमधील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती.
लंडनमधून लवकरच भारतात परतणार असून, सायबर चोरट्याने परिचारिकेला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले होते. परदेशातून महागडी भेट पाठविणार असल्याचे देखील त्याने तिला सांगितलं होतं. परदेशातून पाठविलेले भेटवस्तुंचे खोके घेण्यासाठी २७ हजार रुपये लागतील, असं सांगून परिचारिकेकडून त्याने पैसे उकळले.
दरम्यान सिंगने तिची ध्वनिचित्रफीत तयार केली. ध्वनीचित्रफीतसोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने परिचारिकेकडे खंडणी मागितली. घाबरलेल्या परिचारिकेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण अधिक तपास करत आहेत.