पिंपरी : केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त असून त्या स्वतंत्रपणे काम करत असतात. माझ्यावर देखील अनेक वेळा कारवाई झाली. मात्र त्यातून बाहेर काहीच आलं नाही. रोहितवर कारवाई झाली. त्यानंतर रोहित काय प्रश्न करतोय? तसेच त्याच्या प्रश्नावर मी उत्तर द्यायला तो इतका मोठा नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. पवार यांचा पिंपरी चिंचवड येथील मोशीमध्ये कार्यकर्ता मेळावा आहे. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले. त्यानंतर रोहित पवार यांनी आठ दिवसापूर्वी दिल्लीला कोण गेले होते हे तपासा, असा प्रश्न माध्यमांसमोर उपस्थित केला. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, कोण कधी आणि कुठे गेला होता याचा तपास करा. रोहित पवार यांच्या प्रश्नाला मी उत्तर द्यावं इतका तो मोठा नाही. त्याच्या प्रश्नाला माझ्या पक्षाचे प्रवक्ते व कार्यकर्ते उत्तर देतील. राज्यातील व केंद्रातील तपास यंत्रणा या स्वायत्त असून त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. जर काही केलेले नसेल तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.”