लोणी काळभोर (पुणे): पुण्यातील रमा-माधव रानडे स्मृती समितीच्यावतीने महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी दुभाजकावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केल्याबद्दल यावर्षीचा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे पुरस्कार कदमवाकवस्ती ( लोणी काळभोर, ता. हवेली ) येथील नितीन अंकुश कोलते यांना जाहीर करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे प्रार्थना समाज, पुणे सेवासदन सोसायटी, सार्वजनिक सभा या सर्व संस्थांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील सर्व संस्थांनी एकत्रित येऊन रमा-माधव रानडे स्मृति समितीची स्थापन केली आहे. या समितीच्यावतीने १६ जानेवारी रोजी दरवर्षी न्या रानडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी या कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. त्यानिमित्ताने यावर्षी प्रसिद्धिपराङ्मुख राहून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समितीच्यावतीने करण्यात येतो.
नितीन कोलते यांनी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी दुभाजकावर जे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले त्याबद्दल यावर्षीच्या न्या रानडे पुरस्काराने त्यांना सम्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि १६ जानेवारी रोजी सायं ५:३० वाजता वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वास्तूत संपन्न होणार आहे. अशी माहिती वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे यांनी दिली.