दीपक खिलारे
इंदापूर : ‘बेटी की रोटी’ फाऊंडेशनच्या अध्यक्षा सीमा कल्याणकर यांनी महिला बचत गटांसाठी ठिबक सिंचन वितरकाचा स्त्युत्य उपक्रम राबवला आहे. यामुळे महिलांना कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन आमदार मनिषा कायंदे यांनी केले.
‘बेटी की रोटी’ फाऊंडेशन वतीने ‘फॉर्चुन इंडस्ट्रीज’च्या व्यवस्थापिका निर्मला सावंत यांच्या सहकार्यातून इंदापूर तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना ड्रीप फिल्टर पी.वी.सी. पाईप स्प्रिंकलर या ठिबक सिंचन साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कायंदे म्हणाल्या की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ‘बेटी की रोटी’ व ‘फॉर्चुन इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून महिला बचत गटांना ठिबक सिंचन वितरण नेमणूक दिल्यामुळे राज्यातील महिला बचत गटांना कृषी क्षेत्रात रोजगार उपलब्ध झाला आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मनिषा कायंदे यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख अॅड. गीतांजली ढोणे म्हणाल्या की, ‘बेटी की रोटी’ व फॉर्चुन इंडस्ट्रीजकडून ठिबक सिंचन वितरणातून प्रत्येक गावातील महिलांना रोजगार मिळणार आहे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे, असे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी उन्नती महिला स्वयंसहाय्यता गटाच्या अध्यक्षा फातिमा शेख (कांदलगाव) व जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता गटाच्या अध्यक्षा सविता चव्हाण (भाट निमगाव) या गटांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरण करण्यात आले. ‘बेटी की रोटी’ फाऊंडेशनच्या सीमा कल्याणकर यांनी सांगितले की, महिला बचत गटांना ठिबक सिंचनविषयी कंपनीच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास नीता कटके, रूपाली रासकर, निलोफर पठाण, निर्मला जाधव, ज्योती शिंदे व सोनम खरात आदी उपस्थित होत्या.