पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १३ तालुक्यांत २३३ ठिकाणी रास्त भाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.
आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी १०, भोर ७, दौंड आणि इंदापूर प्रत्येकी १, हवेली १७, जुन्नर २६, खेड ८, मावळ ३६, मुळशी २८, पुरंदर ९, शिरुर १२ आणि वेल्हे तालुक्यातील ६८ अशा जिल्ह्यातील एकूण २३३ गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ६८ नवीन स्वस्त धान्य दुकाने ही वेल्हे तालुक्यात सुरू करण्यात येणार आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी केवळ एक दुकान हे दौंड आणि इंदापूर तालुक्यात सुरु केले जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. होळकर यांनी सांगितले. याबाबतचा जाहीरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात येणाऱ्या तालुकानिहाय गावांची यादी, या दुकानासाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबतची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातही याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.