ठाणे : शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाला आहे. या वक्तव्याविरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घरासमोर जय श्रीरामच्या घोषणा देत आरती करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला.”
“पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत, म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत,” अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली.
माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 3, 2024
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, आमदार जितेंद्र आव्हाड व्यासपीठावरुन बोलत होते. ”आपण हा इतिहास वाचत नाही. राम हा आपला आहे, बहुजनांचा आहे. शिकार करुन खाणारा राम तो आमचा आणि बहुजनांचा आहे. तुम्ही तिथे आम्हाला ससर्वांना शाकाहारी बनवायला जातात. पण, रामाचा आम्ही आदर्श पाळतो आणि मटन खातो आहोत. राम हा शाकाहारी नव्हताच, तो मांसाहारी होता. 14 वर्षे जंगलात जाणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी अन्न शोधायला, मी जे बोलतो ते खरंच बोलत असतो”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड म्हणाले होते