नवी दिल्ली: मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेल्या संपावर तोडगा निघाला आहे. केंद्रीय गृह सचिवांसोबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस शिष्टमंडळाची चर्चा झाली. यामध्ये नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यानंतर आता मालवाहतूकदार आणि टँकर चालकांचा संप मागे घेतला जाणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारपासून मालवाहतूक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने देखील चालकांना वाहतूक तात्काळ सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
The Government and the transporters have agreed that transport workers will resume their work immediately, they appeal to truck drivers to resume work. https://t.co/9V6E4TOmOf
— ANI (@ANI) January 2, 2024
गेल्या दोन दिवसांपासून मालवाहतूकदार आणि टँकर चालकांचा संप सुरू असल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी इंधनापासून ते भाजीपाला, अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता. देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पेट्रोलपंप इंधनाअभावी ओस पडले होते. तर, पेट्रोल भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या होत्या. या संपाची धग तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मालवाहतूकदारांच्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले. या चर्चेत संपाबाबत अखेर तोडगा काढण्यात आला.