पिंपरी चिंचवड : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ॲक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बारा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील साठ आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ५१ गुन्हेगारी टोळ्यांमधील ३५७ आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याचे संकेत दिसत आहेत.
दरम्यान, पिंपरी- चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे अनेकदा आढळले आहे. शहरातील गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी नेहमीच त्यांनी कठोर पावलं उचलत करावी देखील केली आहे. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये या गुन्हेगारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, तोडफोड करणे, विनयभंग करणे, अपहरण, खंडणी, दंगा, अश्लील वर्तन करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या तीन सराफांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलेली आहे.