पुणे : भारतीय डाक विभागातर्फे इयत्ता ६ वी ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी “दीन दयाळ स्पर्श योजना” नावाची शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. चांगले शैक्षणिक रेकॉर्ड असलेल्या आणि छंद म्हणून ‘फिलाटेली’ करत असलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्याबाबत ही योजना आहे. शिष्यवृत्तीचा उद्देश “लहान वयात मुलांमध्ये शाश्वत पद्धतीने फिलाटेलीला प्रोत्साहन देणे जे शैक्षणिक अभ्यासक्रमाला बळकट आणि पूरक बनवण्याबरोबरच त्यांना आराम आणि तणावमुक्त करण्यात मदत करू शकेल असा छंद प्रदान करणे” हा आहे.
या अनुषंगाने पुणे ग्रामीण डाक विभागामार्फत इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी पात्रता परीक्षा दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्रायमरी स्कूल देहू रोड येथे घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण ३७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यापैकी पात्रता परीक्षेत निवड झालेल्या २२ विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर प्रकल्प सादर केला. त्या आधारावर ५ विद्यार्थ्यांची दीन दयाळ स्पर्श योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थांमध्ये देहू रोड येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील धनंजय अनिल पवार, समीर रवी जोगी, पलक रवी लोट यांचा समावेश आहे. तसेच डॉ झाकीर हुसेन उर्दू प्रायमरी स्कूल देहू रोड विद्यालयातील सैनाब इर्शाद शेख व फौझिया वासिम सप्यद यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थाना डाक विभागतर्फे महिन्याला रुपये पाचशे प्रमाणे वर्षभर एकूण सहा हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री बाळकृष्ण एरंडे अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, श्री सुकदेव मोरे, सहायक अधीक्षक डाकघर ( मुख्यालय) पुणे ग्रामीण विभाग तसेच श्री भारत गवळी पोस्टमास्तर देहू रोड उपडाकघर यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी जवळच्या डाकघराशी संपर्क साधून या शिष्यवृत्ती योजनेबाबत माहिती घेवून पुढील वर्षी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री बाळकृष्ण एरंडे अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी केले आहे.