बंगळुरु : बंगळुरूमधून नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक २७ वर्षीय अभियंता पार्टी करण्यासाठी मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो पार्टी सेलिब्रेट करत होता. पार्टी केल्यानंतर सिगारेटची अॅश फेकण्यासाठी तो बाहेर आला आणि इमारतीच्या ३३ व्या मजल्यावरून खाली पडला यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्यांशू शर्मा असे मृत्यू झालेल्या 27 वर्षीय अभियंत्याचे नाव आहे. बंगळुरू पूर्व येथे केआर पुरा भागातील भट्टरहळ्ळी परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये दिपांशू गेला होता. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.
दिपांशू मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून सध्या तो कोडीगहळ्ळी (केआर पुरा) येथे राहत होता. त्याचे वडील भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. ते कुटुंबियांसह उत्तर प्रदेशमध्ये राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी रात्री दिपांशू आणि त्याचे तीन मित्र त्यांच्या मैत्रीणीच्या घरी पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर सर्वजण व्हाईटफिल्ड मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेले.
मात्र चित्रपट आधीच सुरू झाला असल्यामुळे इंदिरानगर भागातील पबमध्ये गेले. तिथून पार्टी करून ते मध्यरात्री अडीच वाजता मित्राच्या फ्लॅटवर पोहोचले. दिपांशूचे मित्र बेडरुमध्ये झोपलेले असताना दिपांशू हॉलमध्येच झोपला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी हॉलच्या खिडकीत रात्री सिगारेट विझवत असताना तोल जाऊन तो थेट खाली कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला
सकाळी दिव्यांशू मृत अवस्थेत सापडल्यानंतर सोसायटीतील लोकांनी याबाबतची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन सर्वांना दिली. एका व्यक्तीचा मृत्यूदेह वॉकिंग ट्रॅकवर आढळला. त्याच्याजवळून आयडी सापडल्यामुळे त्याची लगेच ओळख पटली. त्यानंतर त्याच्या सर्व मित्रांची आम्ही चौकशी केली. तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे पाहण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहोत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.