पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात 5 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्याला स्वागताध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुगगंटीवार, निमंत्रक उदय सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, 5 जानेवारी 2024 सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत गणेश कला क्रीडा मंचावर अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी 8 वाजता पुण्यनगरीचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात येणार आहे. 500 दुचाकी आणि 10 रथावर विराजमान झालेल्या ज्येष्ठ कलाकारांचा, तसेच विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 100 पात्रांचा समावेश या रॅलीमध्ये असणार आहे.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा शुभारंभ सोहळा पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि शंभराव्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, नाट्य संमेलनाचे निमंत्रक आणि उद्योगमंत्री उदय सामंत, विशेष अतिथि म्हणून ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त शशी प्रभू, डॉ. रवी बापट, विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, गिरीश गांधी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि नरेश गडेकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.