मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या प्लेइंग 11 मध्ये झालेल्या बदलाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी झालेला पराभव. यामुळे ३ जानेवारीपासून खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी आवेश खानचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियामध्ये दोन ते तीन बदल पाहायला मिळू शकतात.
अष्टपैलू रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीत खेळणार हे निश्चित आहे. फिट नसल्यामुळे जडेजा पहिल्या कसोटीत प्लेइंग 11 चा भाग नव्हता. पण आता तो प्लेइंग 11 मध्ये आर अश्विनची जागा घेईल. आर अश्विन पहिल्या कसोटीत गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देऊ शकला नाही. अश्विनने पहिल्या डावात 8 धावा केल्या तर दुसऱ्या डावात तो पहिल्या चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अश्विन गोलंदाजीतही कुचकामी ठरला आणि 19 षटकांत त्याला केवळ 1 विकेट घेता आली.
प्रसिद्ध कृष्णाला पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडचा कृष्णावर लावलेला डाव फ्लॉप ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कृष्णाला चांगलेच लक्ष्य केले. कृष्णाने 20 षटकात गोलंदाजी करताना 93 धावा दिल्या आणि त्याला केवळ एक विकेट घेण्यात यश आले. यामुळे कृष्णा प्लेइंग 11 मधून बाहेर पडणे निश्चित आहे. कृष्णाच्या जागी आवेश खानला संधी दिली जाणार आहे.
पहिल्या कसोटीत फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर अय्यर आणि गिलही निशाण्यावर आहेत. गिलला अद्याप कसोटी फॉर्मेटमध्ये स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही. 19 कसोटी खेळल्यानंतर गिलची फलंदाजीची सरासरी केवळ 31 आहे, जी अत्यंत खराब मानली जाऊ शकते. असे असले तरी संघ व्यवस्थापनाचा गिलवर विश्वास कायम असून तो दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. शॉर्ट बॉलिंगविरुद्ध खराब कामगिरीमुळे अय्यर निशाण्यावर आहे. पहिल्या कसोटीत अय्यरने 31 धावांची खेळी करत क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन त्याला आणखी एक संधी नक्कीच देईल