पुणे: अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आपल्याला विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केली आणि तसे निवेदनही दिले. अजित पवार यांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा निधी अजित पवारांनी रोखून धरल्याचा या सदस्यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी तब्बल 800 कोटी रुपयांचा विकास निधी पवार यांनी मंजूर केला आहे.
अजित पवार पालकमंत्री बनल्यानंतर आपल्याला डावलत असल्याचा आरोप भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या दहा सदस्यांनी केला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी रितसर तक्रार करुन या सदस्यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. यामुळे पुण्यातील महायुतीमधील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. खरं तर जिल्ह्यातील रस्ते, पाणी, समाज मंदिरे यासाख्या विकासकामांसाठी हा निधी वापरायचा असतो. मात्र, गेल्या काही काळात मर्जीतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निधीचे वाटप करण्याचा प्रघात पडला असून त्यातूनच महायुतीत वाद निर्माण झाला आहे.
अजित पवार यांच्या आधी पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे रोजी झालेल्या बैठकीत 450 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील बहुतांश निधी भाजप आणि शिंदे गटातील सदस्यांनी सुचवलेल्या कांमाना मंजूर करण्यात आला होता. मात्र, अजित पवार राज्य सरकारमधे सहभागी होत पुण्याचे पालकमंत्रीपद मिळवले. त्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांनी मंजूर केलेला निधी रोखून धरला. त्याचबरोबर आपल्या मर्जीतील सदस्यांना तब्बल आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील फक्त दहा टक्के निधी आपल्याला मिळाल्याचा आरोप भाजपच्या या सदस्यांनी केला आहे.