पिंपरी: श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबर ते २ जानेवारी या दरम्यान चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे यंदाचे ४६२ वे वर्ष आहे. तसेच यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव म्हणाले की, महोत्सवानिमित्त पाच दिवस समाधी मंदिर, श्री मंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन, चरित्र पठण, लक्ष्मी-विनायक याग होईल. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी अपर्णा कुलकर्णी यांचे क्रांतिवीर चापेकर बंधू या विषयावर व्याख्यान, स्त्रीजीवनाला समर्पित ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ हा गायनाचा कार्यक्रम होईल. उत्सवात प्रिया जोग यांचे विष्णूसहस्रनाम या विषयावर व्याख्यान, अनय जोगळेकर यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने केलेली प्रगती या विषयावर व्याख्यान, पं. उल्हास कशाळकर यांचे गायन, लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी यांचे कीर्तन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त सुनील देवधर यांचे व्याख्यान, श्रीधर फडके यांचा गीतरामायण कार्यक्रम होणार आहे.
१ जानेवारीला दुपारी श्री मोरया गोसावी महाराज जीवन चरित्र हे दशावतारी नाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सावनी शेंडे, अमर ओक, सहकलाकारांचा कार्यक्रम होईल. २ जानेवारीला संजीवन समाधीची महापूजा, मंदिरावर पुष्पवृष्टी, प्रसादबुवा रामदासी यांचे कीर्तन होईल. सायंकाळी संजीवन समाधी मंदिरात भव्य आतषबाजी आणि चिंचवड येथील स्वराज्य ढोलताशा पथकाची मानवंदना होणार आहे. रात्री मंगलमूर्ती वाडा येथील धुपारतीने महोत्सवाची सांगता होईल.