Indian Aircraft : मानवी तस्करीच्या संशयावरून गेल्या चार दिवसांपासून फ्रान्समध्ये भारतीय विमान अडकले होते. फ्रान्स सरकारने ताब्यात घेतलेल्या विमानातील ३०३ भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. या प्रवाशांना भारतात परत आणण्याचे भारत सरकारचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. आज म्हणजेच मंगळवारी पहाटे हे विमान मुंबईत उतरले आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून अडकून पडलेल्या भारतीय प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. वृत्तानुसार, फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या विमानामध्ये ३०३ भारतीय होते. यापैकी २७६ भारतीय मुंबईत परतले आहेत. तर दोन अल्पवयीन प्रवाशांसह २५ प्रवासी फ्रान्समध्येच थांबून आहेत. त्यांनी फ्रान्सकडे आश्रयासाठी अर्ज केला होता. २३ डिसेंबर रोजी दुबई येथून भारतीय नागरिकांना निकाग्वारकडे जाण्यासाठी निघालं होतं. मात्र, तांत्रिक दुरुस्तीसाठी विमान फ्रान्सच्या वॅट्री विमानतळावर उतरवण्यात आलं. दरम्यान, विमानाचा वापर मानवी तस्करीसाठी केला जात असल्याचा संशय फ्रान्सच्या तपास यंत्रणांना आला होता.
त्यानंतर फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांनी विमान ताब्यात घेत तपास सुरू केला. सर्व प्रवाशांना विमानतळावरील रिसेप्शन हॉलमधून थांबवण्यात आलं होतं. फ्रान्सने भारतीय विमान रोखताच दिल्लीपासून पॅरिसपर्यंत मोठी खळबळ उडाली होती. या विमानाला भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू होते.
दरम्यान, फ्रान्सच्या न्यायालयाच्या आदेशानंतर या विमानाला भारताकडे उड्डाण करण्याची परवानगी दिली. ४ न्यायाधीशांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची चौकशी केली आणि त्यानंतर विमान सोडण्याचे आदेश दिले. सोमवारी सकाळी फ्रान्समधील वाट्री विमानतळावरून या विमानाने उड्डाण घेतले. मंगळवारी पहाटे २७६ प्रवाशांसह हे विमान मुंबई विमानतळावर उतरलं.
विमानातील काही प्रवाशांनी आपल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून प्रवाशांपैकी १० जणांनी फ्रान्स सरकारकडे आश्रय देण्यासाठी अर्ज केला आहे. विमानात पालक बरोबर नसलेली ११ बालके होती. हे विमान रोमानियामधील एका कंपनीचे आहे. त्या कंपनीने मानवी तस्करीचा आरोप फेटाळून लावला आहे.
Aircraft with 303 Indian passengers held in France lands at Mumbai airport
Read @ANI Story | https://t.co/EntWmNUi3t#France #MumbaiAirport pic.twitter.com/SY5lfsZOJ6
— ANI Digital (@ani_digital) December 26, 2023