पुणे : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे (पुणे) प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मका कणसाचे आवरण सोलण्याच्या यंत्राचे (कॉर्न पीलिंग मशीन) पेटंट भारतीय पेटंट विभागाकडून मिळाले आहे. या यंत्राच्या साह्याने मक्याच्या एका कणसाचे आवरण सोलण्यासाठी अवघे १० ते १५ सेकंद लागतात तर प्रति मिनिटाला तब्बल २ किलो मक्याच्या कणसांचे आवरण सोलून होते. या यंत्राची क्षमता थक्क करणारी आहे. शिवाय या यंत्रामुळे मका बियांचे नुकसान देखील टाळता येणार असल्याने, महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
या यंत्रासाठी कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. अरुण ठाकरे आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे विद्यार्थी धीरज शहा, पांडुरंग पवार, निलेश पवार आणि छाया बडे यांनी सहकार्य केले आहे. या यंत्राची अभिनव रचना, उपयुक्तता आणि मका पिकावरील प्रक्रिया यामुळे कणसाचे आवरण सुरक्षितरित्या काढता येणार आहे. तसेच मका बियांचे नुकसान देखील टाळता येणार आहे.
विद्यार्थी धीरज शहा, पांडुरंग पवार, निलेश पवार आणि छाया बडे यांनी डिझाइननुसार प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी खूप योगदान दिले ते देखील पेटंटधारक आहेत. रायसोनी कॉलेज नेहमीच समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठीचे व उपयुक्त उपायांसाठीचे आवश्यक शिक्षण देते. यामुळे विद्यार्थ्याला वास्तविक जीवनातील समस्या समजून घेता येतात आणि त्यावर उपाय शोधता येतात. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी पेटंट मिळाल्याबद्दल शोधकर्त्यांचे अभिनंदन केले.
‘कॉर्न पीलिंग मशीन’ची वैशिष्ट्ये
– यंत्रामुळे मका कणिस सोलून त्यातील बिया वेगळे करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
– शेतकरी, कृषी-प्रक्रिया उद्योजक आणि मका धान्य व्यापाऱ्यांसाठी अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर.
– मानवी मेहनत लक्षणीयरीत्या कमी होणार.
– एका कणसाचे आवरण सोलण्यासाठी फक्त १० ते १५ सेकंद लागतात.
– प्रति मिनिटाला २ किलो कणसांचे आवरण सोलण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे.
– यंत्राच्या रोलर्ससाठी अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेटेड (UHMW) पॉलिथिलीन मटेरिअलचा वापर.
– दीर्घायुष्य आणि लवचिक यंत्र.
– साइड रोलर्सवर चौकोनी आकाराच्या दातांसह मशीन कॉर्न बियांचे नुकसान टाळते.
– कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारशील आणि धोरणात्मक डिझाइन.