नागपूर: राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन सुरु असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. यामुळे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल असे मुंडे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबवणार असल्याची घोषणा देखील मुंडे यांनी केली. नमो किसान महासन्मान, पीकविमा, अवकाळीचे अनुदान यांसह विविध योजनांची आकडेवारी धनंजय मुंडेंनी आज विधानपरिषदेत मांडली.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांचे सरकार गेले, हे सरकार प्रामाणिक काम करणारे सरकार आहे. दोन्ही हातांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची नियत असलेले हे सरकार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. मंगवारी विधानपरिषदेत नियम 97 अंतर्गत चर्चेच्या उत्तराच्या निमित्ताने मुंडे बोलत होते.
राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन महाराष्ट्र शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायातीत ही यंत्रे बसवण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळणार आहे. पावसाचे मोजमाप व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल, असंही कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.