लोणी काळभोर: ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, ‘सियावर रामचंद्रजी की जय’, ‘प्रभू श्री रामचंद्रकी जय,’ ‘जय श्री राम’, अशा विविध जयघोषात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रामदरा शिवालयात अक्षता कलशाचे विधीवत पूजन १००८ श्री हेमंत पुरी महाराज यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१९) करण्यात आले. यावेळी पूर्व हवेलीतील १९ गावांना कलशाचे वितरण करण्यात आले.
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येत येण्यासाठी रामभक्तांना निमंत्रण देण्यासाठी अक्षता अभिमंत्रित करून अक्षता कलश लोणीकाळभोर येथील रामदरा शिवालयात आणण्यात आला होता. या अक्षता कलशांचे समरसता यज्ञ करून विधिवत पूजन करण्यात आले.
हिंदू धर्मातील विविध संप्रदायांतील एकेका दाम्पत्यास प्रातिनिधिक स्वरूपात यज्ञाला बसविण्यात आले. नंतर पुरुषांनी हे अक्षता कलश डोक्यावर घेऊन श्रीराम मंदिरात आणले. तेथे साधू-संतांनीही कलशांचे पूजन केले. त्यानंतर रामदरा शिवालय परिसरातून या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रभू श्रीरामांची मूर्ती, सनई, बँड, चौघडे तसेच भगवे ध्वजधारी रामभक्त सहभागी झाले होते. या दरम्यान, हनुमान चालीसा पठण, श्री रामाचे, हनुमानाचे नामस्मरण, जयघोष व आरती करण्यात आली. या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
रामदरा शिवालय ट्रस्टच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व हवेलीतील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून अक्षदा कलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, हा अक्षता कलश पूर्व हवेलीतील मांजरी, शेवाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, पेठ, नायगाव, आळंदी म्हातोबाची, वळती, तरडे, शिंदवणे, सोरतापवाडी, उरुळी कांचन, टिळेकर वाडी, खामगाव टेक, भवरापूर, कोरेगाव मूळ, प्रयागधाम या १९ गावांमध्ये वितरीत करण्यात आला आहे.
अक्षता कलशाचे ३१ डिसेंबरपर्यंत मिळणार भाविकांना दर्शन
अक्षता कलशाचे भाविकांना ३१ डिसेंबरपर्यंत दर्शन मिळणार आहे. त्यानंतर या कलशातील अक्षता घरोघर वितरीत करुन अयोध्येतील रामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण रामसेवक देतील. 22 जानेवारीला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी सर्व भाविकांनी जवळच्या मंदिरात हा अक्षता समर्पित करुन विविध धार्मिक कार्यक्रम करावेत.
– श्री हेमंत पुरी महाराज १००८ (श्री रामदरा शिवालय, लोणी काळभोर)