Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ सिनेमावरून सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा पुढे आक्षेपार्ह धार्मिक वादापर्यंत पोहचली. शहरातील जिन्सी भागात रविवारी मध्यरात्री तणावाच वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या समयसूचकतेने परिस्थिती नियंत्रणात आणून पोलिसांनी या प्रकरणी किशोर गणेश गव्हाणे (वय 27 वर्ष, रा. वैजापूर) याला अटक केली. पोलिसांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम समाजातील महत्वाच्या लोकांच्या मदतीने जमावाला शांत करण्याचे आवाहन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. याचवेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट किशोर गव्हाणे नावाच्या तरुणाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याने शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर जिन्सीतील पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम समाजातील महत्वाच्या लोकांच्या मदतीने जमावाला शांत केले.
नेमकं काय घडल?
सऊद नावाच्या व्यक्तीला इन्स्टाग्रामवर किशोर नावाच्या अकाऊंटवरून मुस्लिम समाजातील मुली आणि महिलांबाबत अश्लील भाषेत पोस्ट करण्यात आली आणि ही माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती जमावाला समजताच जिन्सी पोलीस ठाण्यासमोर जमावाने गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधिकाऱ्यांनीही तत्काळ गुन्हा दाखल करून कार्यवाही सुरू केली. याशिवाय प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिन्सी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून घेत पोलिसांच्या फिरत्या वाहनावरून सर्व तरुणांना शांततेचे आवाहन करण्यात आले.
सोबतच, संबंधिताचे अकाऊंट डिलीट करण्यात आले. विशेष म्हणजे स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि गर्दी देखील कमी झाली. सोशल मीडियावर मुस्लीम धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील असे माहीत असुन सुध्दा जाणीवपुर्वक हिंदु व मुस्लीम धर्मीयामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे उद्येशाने जाणीवपुर्वक इंस्टाग्रामवर मॅसेज टाकुन कृत्य केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान गुन्ह्यातील आरोपी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पळुन जात आहे. अशी माहीती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्याचा पाठलाग करुन आरोपी किशोर गणेश गव्हाणे (वय 27 वर्षे रा. बाभुळगांव बु, ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) याचा शोध घेवुन त्याला कन्नड येथुन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.