लोणी काळभोर (पुणे) : राज्यासह पूर्व हवेलीतील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी आता त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस ग्रामपंचायतीचे कामबंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाकडून विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. १८ ते २०) डिसेंबरपर्यंत हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्याचे निवेदन प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, प्रशासक, सरपंच यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
या संपात अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना, ग्राम रोजगार सेवक संघ, राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना सहभागी आहेत.