Health News : पुणे : सध्या वातावरणात थंडी वाढू लागली आहे. थंडीत आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे असते. रोजच्या आहारात थोडासा बदल करून आरोग्याची काळजी घेता येते. या दिवसात शरीरात ऊर्जा निर्माण करणारे पदार्थ खाणेही गरजेचे असते. थंडीच्या दिवसांत मुळा आणि मुळ्याची भाजी खाणे आरोग्यास उत्तम मानले जाते.
मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. रोजच्या जेवणात मुळ्याचा वापर केल्यास कॅन्सर, मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येते. मुळ्यामधील फोलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी हे घटक कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. याशिवाय, तोंड, पोट, आतडे, किडनी यांना होणाऱ्या कॅन्सरसाठी मुळा गुणकारी आहे. मूत्राशयातील आजार, कोरड्या ढेकर येत असल्यास त्यावर मुळ्याचा रस उपयुक्त ठरतो.
तसेच सर्दी आणि खोकल्यावरही मुळा उपयुक्त ठरतो. मुळ्याची साल सर्दीवर गुणकारी ठरते. लहान मुलांमधील सर्दी कमी करण्यासाठी मुळा उपयुक्त असतो. या ऋतूमध्ये मानवाचे शरीर मजबूत करण्यासाठी जेवणात मुळ्याचा वापर करावा. रोज सकाळी मुळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रोज मुळा खाणे उत्तम ठरते.
बदलत्या हवामानात आपण सतत आजारी पडत असाल तर आपल्या जेवणात मुळ्याचा वापर करावा. मुळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. रक्तवाहिन्या प्रवाहित होण्यास कच्या मुळ्याच्या पानांची भाजी बनवून खाणे फायदेशीर ठरते.