Nerul News : नवीन मुंबई येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केला आहे. नंतर त्याचं फुटलेल्या काचेच्या बाटलीने तिच्यावर सपासप वार करून तिला गंभीर जखमी केलं आहे. याबाबत
एका वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.
त्या वृत्तानुसार, ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इमाम हसन शमशुद्दीन, असं या भिकारी हल्लेखोरचं नाव आहे. या 21 वर्षीय पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं एका अधिकाऱ्याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे.
नेमकं घडलं काय?
नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहणारी तरुणी मित्रासोबत नेरूळ येथील एका महाविद्यालयात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास ती एका बसस्थानकावर उभी होती. हा भिकारी घटनास्थळी आला आणि काचेच्या रिकाम्या बाटलीने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. आधी तरुणीच्या डोक्यावर वार केले आणि नंतर काचेच्या तुकड्यांनी तिच्या पोटात वार करून आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली, अशी माहिती नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.