अहमदनगर : खासगी बँकेकडून कर्ज घेऊन विकत घेतलेल्या मालवाहू टेम्पोचे तीन महिन्यांचे हप्ते थकल्याने बॅंकेने कोणतीही नोटीस न बजावता परस्पर टेम्पो विकला. बॅंकेच्या जाचाला कंटाळून अहमदनगरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देण्यासोबतच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख केला आहे. या नोटमध्ये मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाचा उल्लेख केला असून, याप्रकरणी वसंत मोरेच मला मदत करू शकतील, असे म्हटले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोहन आत्माराम रक्ताटे असे आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगर येथील गुगळे कॉलनी बुऱ्हाणनगरजवळ राहणाऱ्या मोहन रक्ताटे यांनी मालवाहू टेम्पो विकत घेतला होता. त्यासाठी त्यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज काढले होते. मात्र, काही कारणांनी बॅंकेचे कर्जाचे दोन हप्ते थकल्याने बँकेने रक्ताटे यांचा टेम्पो जप्त केला. त्यानंतर नोटीस न बजावता बॅंकेने परस्पर टेम्पो विकला. तसेच बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून रक्ताटे यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. झालेल्या प्रकाराचा रक्ताटे यांना मानसिक त्रास झाला. याच त्रासातून रक्ताटे यांनी १० डिसेंबर रोजी विषारी औषध पिवून आत्महत्या केली.
दरम्यान, रक्ताटे यांच्या दुचाकीच्या डीकीमध्ये एक नोट आढळली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने ही नोट होती. वसंत मोरेच मला न्याय देतील, असे त्यामध्ये लिहिले होते. कोणतीही नोटीस न बजावता परस्पर गाडी विकली. तसेच मला जातीवाचक शिवीगाळ करून दम दिल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे नोटमध्ये नमूद केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन रक्ताटे यांनी २०२२ मध्ये टेम्पो खरेदी केला होता. दरम्यानच्या काळात त्यांचे वडील आत्माराम बाळाजी रक्ताटे यांचे निधन झाले. निधनाला एक महिना उलटायच्या आतच गाडीचा अपघात झाला आणि गाडी दोन महिने दुरुस्तीसाठी बंद होती. रक्ताटे यांनी खासगी बँकेचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ या तीन महिन्यांचे हप्ते भरले नव्हते. व्यवसाय होत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. दरम्यान, गाडी विकून राहिलेले हप्ते देण्याचा त्यांचा विचार होता, मात्र हा व्यवहार जुळला नाही. अखेर त्यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन बँकेचे कर्ज फेडण्याचा विचार केला. याबाबत त्यांनी बँकेशी संपर्क साधला आणि फोर क्लोज साठी विनंती केली. मात्र, बँकेने टाळाटाळ केल्याचा आरोप देखील त्यांनी नोटमध्ये केला आहे. बॅंकेने व्यवहार न जुळल्याने नोटीस न देता गाडी विकली. बँकेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, कर्मचारी आणि त्यांच्यात वादावादी झाली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी रक्ताटे यांना जातीवाचक शिवीगाळ देखील केल्याचे नोटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वसंत मोरे यांनी पीडित कुटुंबाची तसेच पोलिसांची भेट घेतली. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मोरे यांनी केली. तत्काळ गुन्हा दाखल न झाल्यास मनसे स्टाईल जवाब देण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.