मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जातात. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा कायम आमदार नितेश राणे करत आले आहेत. एकीकडे हे सर्व घडत असताना, तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी मात्र आदित्य यांची पाठराखण केली आहे.
मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल, चौकशा तर कोणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय, अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे.
मनसेच्या स्वयंरोजगार विभागाकडून महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील मराठी पत्रकार संघात करण्यात आले आहे. ‘उद्योग कर उद्योग’ या संकल्पनेंतर्गत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनेक संधी एकाच मंचावरती उपलब्ध करून देऊन उद्योग क्षेत्रा संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शर्मिला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी आदित्य ठाकरेंसंदर्भात बोलताना दिशा सालियनप्रकरणी त्याने काही केलं असेल असं वाटत नाही. चौकश्या तर आमच्या पण लावल्या होत्या, आम्ही पण यातून गेलोय असं त्या म्हणाल्या.