मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाला येथे टी-20 आणि वनडेनंतर कसोटी मालिका खेळायची आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळणार असलेल्या संघाला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या दौऱ्यातून बाहेर होऊ शकतो.
या वर्षाच्या अखेरीस खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला वाईट बातमी मिळाली आहे. 26 डिसेंबरपासून म्हणजेच बॉक्सिंग डे रोजी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाला यजमानांवर दडपण आणण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही महत्त्वाचे हत्यार असणार नाही. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर असल्याची बातमी आहे.
मोहम्मद शमी दुखापतीमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा हा स्टार वेगवान गोलंदाज घोट्याच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. दुखापतग्रस्त असूनही तो आयसीसी वनडे विश्वचषक खेळला. 15 डिसेंबरला कर्णधार रोहित शर्मासोबत सर्व खेळाडूंना रवाना होणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शमीचे नाव या यादीत नसेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना वर्षाच्या अखेरीस 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार आहे. दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पुढील वर्षी भारताचा हा पहिलाच सामना असणार आहे. 3 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.