उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एक थरारक घटना घडली आहे. एक महिला आपल्या बाल्कनीत कपडे सुकवण्यासाठी गेली असताना सातव्या मजल्यावरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या दुर्घटनेत महिला थोडक्यात बचावली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगर शहरात कॅम्प ५ परिसरात महालक्ष्मी टॉवर इमारत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातव्या मजल्यावर कोमल तेजवानी कपडे वाळत घालत होत्या. त्या लोखंडी ग्रिलमध्ये गेल्या असता ती ग्रील निखळली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ग्रील सोबत त्याही खाली कोसळल्या. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने बाजूला असलेल्या दुमजली इमारतीच्या टेरेसवर लावलेल्या पत्र्यावर पडल्या.
यावेळी झालेल्या आवाजामुळे लोकांच्या लक्षात आलं. या दुर्घटनेची माहिती पालिका अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी महिलेला सुखरूप खाली उतरवले. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.