Farmer Suicide: राज्यात अनेक भागात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे बळिराजा चिंतेत असून शेतकरी वर्गात आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. अशातच एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी बँकेने नोटीस पाठवल्याने टोकंच पाऊल उचललं आहे. कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धाकादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नारायण भाऊसाहेर करंगळ असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील शेतकरी नारायण यांनी बॅंक ऑफ बडोदा बॅंकेकडून 4 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतलं आहे. मात्र, हेच कर्ज व्याजासह 7 लाख 11 हजार 940 रुपये झाले आहे.
तसेच, हे कर्ज भरण्याबाबत बॅंकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. यंदा अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना चांगले पीक लाभले नाही, अश्या परिस्थितीत बॅंकेचे कर्ज कस फेडायचं या चिंतेत त्यानी आत्महत्या केली. या घटनेनंतर गावात मोठी शांतता पसरली.
घरातील सर्व जबाबदारी नारायण यांच्यावर होती, अशा परिस्थितीत घर सांभाळणं कठीण झाले होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली. बॅंकेकडून आलेल्या नोटीस पाहून त्यांना काहीच सुचेनास झालं. त्यानंतर त्यांनी विषारी औषध प्राशान केले.
माहिती मिळताच नातेवाइकांच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.