Bank Holidays : मुंबई : बँकेची सुट्टी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचा खोळंबा हे ठरलेले. मात्र ही सुट्टी कर्मचाऱ्यांसाठी मात्र फायद्याची ठरते. आता पुन्हा बँकांच्या सुट्ट्यांच्याबाबतीत चर्चा होऊ लागल्या आहेत. बँक कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुट्ट्यांविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. कारण, सणवार असो किंवा मग एखादा विशेष दिवस, या मंडळींना भरपगारी सुट्टी लागू होते. आता पुन्हा एकदा बँका आणि सुट्ट्या हा मुद्दा चर्चेत येण्यामागं कारण ठरत आहे एक प्रस्ताव. जो भागवत कराड यांनी ससंदेत मांडला.
2015 मध्येच भारत सरकारनं एक महत्त्वाचा नियम लागू केला होता. ज्यामध्ये महिन्यातील दोन शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून देशातील सर्व बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीसुद्धा सुट्टी देण्यात आली. यामध्ये खासगी आणि सार्वजनिक विभागातील सर्व बँकांचा समावेश होता.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मंगळवारी एक प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती संसदेत दिली. या प्रस्तावामध्ये देशातील प्रत्येक बँकेला आठवड्याच्या प्रत्येत शनिवार आणि रविवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. थोडक्यात सदर प्रस्तावामध्ये बँकांना आठवड्याचे ५ दिवस कामांचे असतील अशी मागणी उचलून धरण्यात आली. अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी ससंदेत हा प्रस्ताव सादर केला. ज्यामुळं आता येत्या काळात बँक कर्मचाऱ्यांना आठवड्याचा प्रत्येक शनिवार- रविवारी सुट्टी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.