गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील मुळा-मुठा नदीवरील देलवडी गावच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
मुळा मुठा नदी किनाऱ्यावर देलवडी, पारगाव, पिंपळगाव, संगम, राहू याठिकाणी शेतीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून उपसा जलसिंचन योजना राबविल्या आहेत. या नदीच्या किनाऱ्यावर १०० हून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत मोटारी बसविल्या आहेत. सोमवारी रात्री चोरट्यांनी ७ शेतकऱ्यांच्या अंदाजे ६० हजार रुपये किंमतीच्या कॉपर केबलची चोरी केली आहे, अशी माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली.
रमेश शेलार, महेश शेलार, केशव टकले, बाजीराव सुळ, डी. आर. शेलार, माणिक शितोळे, पोपट काटे, संतोष वाघोले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबलची चोरी झाली आहे.
दौंड तालुक्यात केबल चोरी ही नित्याचीच बाब झाली असून, नदीपात्रातील पाणी कमी झाले की दरवर्षी विद्युत मोटारीची केबल चोरी होत असते. सुरुवातीला शेतकरी भुर्दंड सहन करत होते. मात्र, पोलिसांत तक्रार करत नव्हते. परंतु हा प्रकार दिवसेंदिवस वाढत गेल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
चोरीच्या घटनेबाबत बोलताना येथील शेतकरी डी. आर. शेलार म्हणाले की, माझ्यासह ७ शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे त्रस्त असतानाच ही चोरी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर चोरांचा शोध घ्यावा, ही आमची मागणी आहे.