मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर INDIA आघाडीची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. चार राज्यातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी असमर्थता दर्शवली आहे. आघाडीचा धर्म म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव नाराज तर नितिशकुमार हे आजारी आहेत. इंडिया आघाडीतील मतभेदावर चर्चा होईल, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले, सहा डिसेंबरला मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक आहे. निकाल काहाही लागले तरी ही बैठक आधीच ठरली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. अखिलेश यादव नाराज आहते, ममता बॅनर्जी असमर्थ आहेत. तसेच नितिश कुमार यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते येण्यावर प्रश्नचिन्ह आहे. परंतु, आघाडीचा धर्म म्हणून उद्धव ठाकरे बैठकीत असणार आहेत. इंडिया आघाडीत कुठले मतभेद असतील आणि काँग्रेसने काय करायला हवं याच्यावर चर्चा होईल.