पुणे प्राईम न्यूज डेस्क: जीभेवर गोडवा आणणारा पदार्थ म्हणजे साखर. पण साखरेपेक्षा गुळाला अधिक पसंती दिली जाते. कारण, साखर हा अनेक प्रक्रियेतून केला गेलेला पदार्थ आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना साखर खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे साखरेऐवजी गूळ गुणकारी मानला जातो.
हिवाळ्याच्या दिवसांत आजार दूर ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये आढळणारी पोषण तत्त्वे संसर्गाविरूद्ध लढण्याचे आणि शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य करतात. काही जण साखरेऐवजी नियमित गुळाचा चहा पितात. गुळामध्ये पोषकतत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असल्याने घराघरांत गुळाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. व्हिटॅमिन बी ६, प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यांसारख्या कित्येक पोषक घटकांचा गूळ हा अक्षरश: खजिनाच आहे.
गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते.