दीपक खिलारे
इंदापूर : विकासधारा मंचाच्या वतीने इंदापूर येथे होणाऱ्या आनंद कृषी महोत्सव कृषी प्रदर्शनाच्या मुख्य पत्रकाचे अनावरण विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते
करण्यात आल्याची माहिती विकासधारा मंचाच्या अध्यक्षा, शिवसेनेच्या (शिंदे गट) पुणे जिल्हा महिलाध्यक्षा सीमा कल्याणकर यांनी दिली.
शिवसेना पुणे जिल्हा व विकासधारा मंचाच्या संयुक्त विद्यमाने २७ डिसेंबर रोजी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली व अॅड. गीतांजली ढोणे यांच्या सूचनेनुसार इंदापूरमध्ये राज्यस्तरीय आनंद कृषी महोत्सव कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन होणार आहे.
सीमा कल्याणकर पुढे म्हणाल्या की, या प्रदर्शनाच्या निमित्ताने इंदापूरमध्ये स्ट्रक्चर मंडप उभारणी करण्यात येणार आहे. प्रदर्शनातील सर्व स्टॉल प्रीफाब्रिकेटेड स्वरूपाचे असणार आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांचे तसेच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत आत्मा योजनेमार्फत निवड करण्यात आलेल्या विविध शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतमाल उत्पादनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल, खवय्यांसाठी खाद्यांचेही स्टॉल असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.
या प्रदर्शनामध्ये गाय, बैल स्पर्धा, डॉग शो यांचे विशेष आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनासाठी स्वागताध्यक्ष आण्णा काळे, युवक अध्यक्ष शहर प्रमुख अशोक देवकर, शिवसेना महिला अध्यक्षा रूपाली रासकर, निर्मला जाधव, ज्योती शिंदे, सोनम खरात, युवा सेना पदाधिकारी यांच्या संयुक्त कमिटी स्थापन करण्यात आल्याचे विचारधारा मंचाच्या सिमा कल्याणकर यांनी सांगितले.