Rajasthan Assembly Election Result 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत आताचे कल पाहता काँग्रेसला धोबीपछाड करत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप ११२, काँग्रेस ७१, बसप ३ आणि अन्य १० जागांवर आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झालं असल्याचं चित्र आहे. मात्र, भाजप सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोण, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्येच स्पर्धा सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. वास्तविक पाहता वसुंधरा राजे याच भाजपसाठी सर्वाधिक पसंतीचा चेहरा मानल्या जात आहेत. विधानसभा निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर रात्री उशिरापर्यंत वसुंधरा राजे यांनी बैठकां घेण्याचा सपाट लावला होता, अशी माहिती देण्यात आली आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी भाजपचे सरकार सत्तेत होते, यावेळी वसुंधरा राजे याच मुख्यमंत्री होत्या.
मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती
राजस्थान विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री म्हणून भाजप खासदार बालकनाथ यांना अशोक गेहलोत यांच्यानंतर सर्वाधिक पसंती मिळाली होती. भाजपचे खासदार बालकनाथ यांना राजस्थानातील योगी म्हणून संबोधले जाते. एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ज्या नाथ संप्रदायातील आहेत, त्याच संप्रदायाचे बालकनाथही आहेत.
त्यामुळे वसुंधरा राजे यांच्यासह बालकनाथ यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच, जयपूर घराणाच्या दीया कुमारी यांच्याकडे वसुंधरा राजे यांचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. भाजपने दीया कुमारी यांना राजस्थान विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जयपूर जिल्ह्यातील विद्याधर नगर या मतदारसंघातून दीया कुमारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.