डोर्लेवाडी, (पुणे) : बारामती तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, कांदा, डाळिंबासह द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा पंचनामे करत असली, तरी पाऊस थांबला नाही तर २५० ते ३०० हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील डोर्लेवाडी व परिसरातील ऊसतोडी बंद झाल्या आहेत. इतर ठिकाणच्या कांद्यांसह इतर काढणी योग्य पिकांना फटका बसत आहे. बहुतेक भागात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची बरसात सुरू आहे. काही ठिकाणच्या पिकांना या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी अवकाळीने काढणी योग्य कांदा, यासोबतच बहर आलेले द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
डोर्लेवाडीवाडीसह झारगडवाडी, सोनगाव गुनवडी या भागातील द्राक्षबागांना बसला आहे. परिसरातील द्राक्षबागा फुलोऱ्यात आणि पोंगा अवस्थेत असल्याने द्राक्षमण्यांची मोठ्या प्रमाणात गळ होत आहे. या बागेवर बुरशीजन्य रोग, घड कुज रोग, डावणी रोगांच्या नियंत्रणासाठी महागडी औषधे फवारूनही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने, मका, कडवळ, कोलमडली आहे. ऊस वाहतूक, तोडणी व वाहतुकीसह साखर कारखान्यावर अनिष्ट परिणाम झाला आहे.
दरम्यान, डोर्लेवाडी या भागात अवकाळी पावसाचा तडाखा जास्त बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जीवापाड जपत जोपासलेला शेतीमाल मागील चार दिवसांपासून अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष, डाळिंब व सध्या गहू, हरभरा पेरण्या यासह अन्य फळबागा व भाजीपाल्याची शेती धोक्यात आली आहे. यावरही मात करत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
हातातोंडाशी आलेला घास पावसाने घेतला हिरावून
पावसामुळे अनेक ठिकाणी उसाची वाहने शेतात अडकून पडली आहेत. द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. डोर्लेवाडी परिसरातील द्राक्ष बागेचे अवकाळीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
– विशाल तुळशीराम जाधव व रत्नसिहं कालगावकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, झारगडवाडी, (ता. बारामती)
अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका द्राक्षबागांना
आजच्या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका द्राक्षबागांना बसला आहे. कुजव्या, करपा, डावण्या, घड जिरणे, आदी संभाव्य रोगांपासून बागा वाचविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातूनच फवारण्यांचा खर्च वाढणार आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.
– सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती.