यवत : कासुर्डी (ता.दौंड) गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग आखाडे यांची तर कासुर्डी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक जगताप निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदाची माळ बाळू आखाडे यांच्या गळ्यात पडली. कासुर्डी (ता. दौंड) गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग आखाडे यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती सरपंच धनश्री विशाल टेकवडे यांनी दिली.
कासुर्डी ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा भैरवनाथ मंदिरात नुकतीच पार पडली. गावच्या विकासात्मक विषयांवर चर्चा झाल्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष कोण असेल यावर चर्चा झाली. त्यानंतर पांडुरंग आखाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पांडुरंग आखाडे हे कासुर्डी गावचे माजी सरपंच असून, गावच्या विकास प्रक्रियेत ते सतत सहभागी सहभागी असतात.
आखाडे यांचा सरपंच धनश्री टेकवडे यांनी शाल, पुष्प हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भि. मा. पाटस कारखान्याचे माजी संचालक गोपीनाथ भोंडवे, दौंड बाजार समिती संचालक संतोष आखाडे, काका गायकवाड,उपसरपंच अशोक सोनवणे, बाळासाहेब टेकावडे, पिंटू आखाडे, उत्तम सोनवणे, दत्ता आखाडे, ग्रामसेवक धनंजय देशमुख यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कासुर्डी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक अशोकराव जगताप तर उपाध्यक्षपदी बाळू जयवंत आखाडे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती सचिव शरद वीर यांनी दिली. कासुर्डी येथील वि. का. सेवा संस्थेच्या संचालक मंडळ बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष काका गायकवाड यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या प्रगतीचे काम करण्यात येईल, असे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले. यावेळी उत्तम सोनवणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाना जगताप, महेंद्र आखाडे, दौंड बाजार समितीचे संचालक संतोष आखाडे, अनिल जगताप, मच्छिंद्र जगताप, सचिव शरद वीर यांसह संस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते.