Kalyan Double Murder : कल्याण शहरात एकाच घरात दोन मृतदेह आढळून आले आहेत. एका व्यापाराने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी व्यापारी फरार झाला आहे. दिपक गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी त्याच्या पत्नी आणि मुलासोबत कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीनमधील एका इमारतीत रहात होता. काल दुपारी दिपकला नातेवाईंकाचा फोन आला होता. तो बऱ्याच वेळ फोनवर बोलत होता त्यानंतर अचानक त्याने पत्नी आणि मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण थोड्याच वेळाने आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दोघांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले. हे दृश्य पाहून नातेवाईक हादरले त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली.आरोपीने असं का केलं याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहे. आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरु आहे.