भोर : खेड शिवापूर परिसरातील अवैध धंद्यांसह वाढती गुन्हेगारी रोखण्यास शिवापूर आणि शिंदेवाडी पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा कृपा आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये कायम होत असते. अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा तपास अद्यापही पोलिसांना लावता आलेला नसल्याने परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. तसेच पोलिसच अवैध धंदे वाढविण्यात भर घालत असल्याची देखील चर्चा आहे.
राजगड पोलीसांच्या हद्दीत अवैध धंद्यासाठी मुभा आहे. कोणीही या आणि जुगारचा अड्डा, हातभट्टी, मटका, अवैध व्यवसाय करण्यासाठी समझोता, तोंडी करार करा व धंदा सुरू करा, अशी परिस्थिती आहे. राजगड पोलीसांच्या हद्दीत जुगार अड्ड्याव पोलिसांचे सुरक्षा कवच असल्यामुळे जुगार खेळण्यासाठी सातारा, पुणे व शेजारील तालुक्यातील दिग्गज अलिशान गाडीमध्ये दिमाखात येतात.
नसरापुर हद्दीत जुगार अड्ड्यावर नुकताच पोलीसांनी छापा टाकला होता. मात्र, हा जुगार अड्डा पुन्हा एका नामंकित हॉटेलच्या मागे पुन्हा सुरू झाला आहे. हा अड्डा पोलीसांच्या आशीर्वादामुळे पुन्हा सुरु झाल्याचे येथे जुगार खेळणाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, याकडे तातडीने पुणे ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांचे अंतर्गत वादाचा फटका
पोलिस ठाण्यातील जुन्या-नव्या कर्मचार्यांच्या अंतर्गत वादाचा फटका या कारवाईवर होताना दिसत आहे. बरेच कर्मचारी नवीन रुजू झाल्याने पोलिस ठाण्यात तू तू-मै मै कायम सुरू असते. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचा यावर अंकुश नसल्याने असे प्रकार सातत्याने पोलीस ठाण्यात घडत असल्याचे नागरिक सांगतात. काही कर्मचारी कारवाई करतात; मात्र त्यांची ही कारवाई बनावट असल्याचे पोलिस ठाण्यातच बोलले जाते.
अवैध व्यावसायिक व पोलिसांची जुळलेली नाळ कोण तोडणार?
अनेक संघटनांनी तक्रारी करूनही अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवणे पोलिसांना जमेनासे झाले आहे. अवैध व्यावसायिकांऐवजी त्यांच्या काही लोकांवर तात्पुरती कारवाई करून सोडून दिले जाते. त्यामुळे येथील अवैध धंदे ही तर नित्याचीच बाब बनली आहे. गावठी पिस्तुले, गुटखा, जुगार, मटका, गोमांस तस्करी, दिवसा होणारी रस्तालूट, तसेच विविध अवैध धंद्यांवर पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही. त्यातूनच अवैध व्यावसायिक व पोलिसांची जुळलेली नाळ कोण तोडणार? हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.