पाचगणी: विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या दमदार परफॉर्मन्सला ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सांस्कृतिक उपक्रमांतर्गत सादर करण्यात आलेली मराठी व हिंदी गीते, ‘आय लव्ह पंचगणी, हम है पंचगणी’ या गाण्याने उपस्थितांच्या प्रचंड गर्दीने टाळ्या अन् शिट्ट्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर, नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, मुख्याधिकारी निखिल जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माने, भाजप तालुका अध्यक्ष अनिल भिलारे, सामजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे, तसेच कमिटीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष शारोम जवानमरदी व फेस्टिव्हल कमिटीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते भाऊसाहेब भिलारे मैदानावर दीपप्रज्वलन करण्यात आले.
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील आयोजित पाचगणी फेस्टिव्हलमध्ये सायंकाळी पाच वाजता विद्यार्थी व प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या कै.भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह पंचगणी’, ‘हम है पंचगणी’ या सामूहिक गीताच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची मने जिंकली.
रोटरी क्लब येथे आयोजित केलेल्या आर्ट गॅलरी, इंटरनॅशनल एंन्व्हायरर्मेंटल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रमही सादर झाला. यावेळी अमीन हाजी व अमृता पोरे यांनी सूत्रसंचालन केले.