यवत : एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यवत ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने देखील विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करून जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालय ते ग्रामीण रुग्णालय जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यवत ग्रामीण रुग्णालय येथे विद्यार्थ्यांना याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
एड्स हा एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे जगभरात आतापर्यंत लाखो रूग्णांनी जीव गमावला आहे. ‘ह्यूमन इमयुनोडेफिशियन्सी व्हायरस’मुळे होणाऱ्या ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (AIDS) या गंभीर आजाराबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून साजरा केला जातो.
एड्स या आजारासंदर्भात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त यवत ग्रामीण रुग्णालयाचे आय.सी.टी. सीचे समुपदेशक राहुल घेवारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एचआयव्ही/एड्स ही एक जागतिक समस्या बनली आहे. या समस्येशी लढा देण्यासाठी
जागतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या रोगाविषयी जनजागृती करणे. त्या अंतर्गत जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. जागरुकता पसरवणे आणि जगभरातील या आजाराने बाधित लोकांना मदत करणे हा उद्देश असून, एड्सने बाधित लोकांना समाजात सुरक्षित आणि सन्माननीय जगता यावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
यावेळी एच.आय.व्ही. व एड्स होण्याची कारणे, घ्यावयाची काळजी, परिणाम याबाबत सखोल माहिती व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे यवत ग्रामीण रुग्णालय येथे आयसीटीसीचे समुपदेशक राहुल घेवारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
अधिपरिचारिका भारती खराडे यांनी शालेय जीवनात मोबाईलचा वापर हे शैक्षणिक साधन म्हणूनच करावे, अर्धवट माहितीच्या आधारे कोणतीही कृती करू नये, असे आवाहन करत एड्सबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उंदरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अंजुमन बागवान, एन.सी.डी समुपदेशक दत्ता जाधव, योगिता आढाव, अनुराधा जगताप, शरविन थोरात, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, विद्या विकास मंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुदळे यांसह शिक्षक वर्ग, रुग्णालयाचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.