सागर जगदाळे
भिगवण : पुण्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना भिगवण पोलिसांनी शनिवारी (ता.१७) रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकीसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी तब्बल ७ गुन्ह्यांची उकल केली आहे.
चैतन्य पांडुरंग शेळके (वय-२०) आणि किशोर सहदेव पवार (वय २० दोघेही रा. भोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.१७) रात्री भिगवण गावाच्या हद्दीत पोलीस गस्त घालत असताना, पोलिसांना दोन इसम संशयास्पदरीत्या अंधारात फिरस आसल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक लोखंडी धारदार कोयता व लोखंडी गज, एक ज्युपिटर मोटार सायकल मिळून आली. त्यांच्याकडून दुचाकीसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी चैतन्य शेळके आणि किशोर पवार याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ज्युपिटर मोटार सायकल चोरी केली आहे. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर चालकाला आडवुन मारहाण केली. त्याच्याजवळील रोख रक्कम व ट्रॅक्टर जबरीने चोरी केली आहे. परंडा येथुन मोबाईलची चोरी, भिगवण, बारामती तालुका आणि यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. त्यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, अजित सरडे, होमगार्ड आप्पा सातपुते, लक्ष्मण ढवळे, पोलीस मित्र रवी काळे, सिधु आळंदकर आणि अशोक सुळके यांच्या पथकाने केली आहे.