राहुलकुमार अवचट
यवत : भिमा पाटस कारखान्याने चालू गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३ हजार रूपये देण्याचा निर्णय एम.आर.एन. ग्रुपचे अध्यक्ष मुर्गेश निराणी व कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार ॲड. राहुल कुल यांनी एकत्रित घेतल्याची माहिती अध्यक्ष तथा आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली.
या वेळी बोलताना भिमा-पाटसचे आमदार ॲड. राहुल कुल म्हणाले की, यावर्षी कारखान्यात येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता ३ हजार रूपये जाहीर केला आहे. त्यानुसार आजपासून हे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमावेळी आमदार ॲड. कुल यांनी इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल असे आश्वासन शेतकरी व सभासदांना दिले होते, त्यानुसार पहिला हप्ता ३ हजार रुपये भाव जाहीर करून, हे आश्वासन आमदार ॲड. कुल यांनी पूर्ण केले आहे.
सध्या भिमा-पाटस कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु असून, आज अखेर ६० हजार मेट्रीक टनाचे गाळप पूर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व आमदार ॲड. राहुल कुल यांनी केले आहे.