लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला छातीत अचानक कळा येऊ लागल्या. त्यानंतर चालकाने ट्रक लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाजूला घेतला.
नातेवाईकांना छातीत वेदना होत असल्याचे सांगितले. जेवण करून पुन्हा ट्रकमध्ये झोपण्यासाठी गेला तो कायमचाच झोपला. मात्र, संबंधित चालक या कालावधीत हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बड्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला असता, तर त्याचे प्राण वाचले असते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सतपाल झेटिंग कावळे (वय -४५, रामलिंग मुडगड, ता.निलंगा. जी. लातूर) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कावळे हे कर्नाटकाहून माल ट्रकमध्ये भरून पुण्याच्या दिशेने चालले होते. पुणे- सोलापूर महामार्गावरून जात असताना त्यांची ट्रक लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात आली असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला.
ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ट्रक चालक कावळे खाली उतरले. कावळे यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन केला व माझ्या छातीत तीव्र वेदना होत आहेत, फोनद्वारे सांगितले. नातेवाईकांनी त्यांना जेवण करून थोडा वेळ आराम करण्यास सांगितले. त्यानुसार, कावळे जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी गेले. त्यानंतर ते उठलेच नाहीत.
वैद्यकीय उपचाराचा सल्ला दिला असता तर…
नातेवाईकांनी कावळे यांना ताबडतोब जाऊन दवाखान्यात उपचार घ्या, असे म्हटले असते तर कावळे यांनी त्या ठिकाणी एक तास घालवला नसता. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी दूर जावंही लागलं नसतं. कारण, कावळे यांना ज्या ठिकाणी त्रास जाणवू लागला त्यापासून हाकेच्या अंतरावर एक दवाखाना होता. तेथे त्यांनी त्वरित उपचार घेतले असते. तर त्यांचे प्राण वाचले असते.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिक विजय महानवर यांनी लोणी काळभोर पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्राला फोनद्वारे संपर्क करून दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार महावीर कुठे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विकास बनसोडे तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. बनसोडे यांनी कावळे यांची तपासणी केली असता कावळे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
इतरांची काळजी घेतली, पण स्वत:कडे दुर्लक्ष केलं
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सतत रहदारी असते. या महामार्गावरून हजारो वाहने दैनंदिन ये-जा करतात. या महामार्गावरून ट्रक चालवताना सतपाल कावळे यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी ट्रक महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर थांबविला. कोणतीही दुर्घटना होऊ नये त्यांनी इतरांची काळजी घेतली. पण काही अंतर जाऊन वैद्यकीय उपचार न घेता स्वत:कडेच दुर्लक्ष केल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.