हनुमंत चिकणे
उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत दिमाखदार झाली असून, या ठिकाणी आता ग्रामस्थांनी सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
इनामदारवस्ती या ठिकाणी असलेली जिल्हा परिषद शाळा ही ग्रामस्थांच्या लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय घेतला अन् जिद्दीने तो प्रत्यक्षात उतरवला आहे. या परिसरात राहत असलेल्या गरीब व गरजू मुलांसाठी स्पर्धेच्या युगात या ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
अष्टापूर केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेची इनामदारवस्ती येथे ही शाळा आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. या शाळेत एकूण ७० ते ७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये ३० ते ३२ मुले तर ३५ ते ४० मुली शिक्षण घेत आहेत.
शाळांमध्ये मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, भाषण, लेखन, अभिनय, गायन व अन्य विषयांमध्ये प्रावीण्य मिळवून देण्यासाठी या शाळेला इंग्लिश मिडीयम स्कूलचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहेत.
पहिली ते चौथीपर्यंत वर्ग, शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय बाबी, स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीतील वर्गखोल्या, क्रीडांगण, दळणवळणासाठी साधने, भविष्यात विद्यार्थी संख्या वाढल्यास इमारत वाढविण्यासाठी पुरेशी जागा व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता या शालेय शिक्षण विभागाने ठरवलेल्या निकषांत या शाळेची बांधणी करण्यात आली आहे.
कोरेगाव मूळ हे गाव पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला विस्तारले असून, इनामदारवस्ती येथे मोठ्या प्रमाणावर नर्सरी व्यावसायिक असल्याने या ठिकाणी वस्त्यांची संख्या मोठी आहे. या भागात सोलापूर, लातूर, बीड, नांदेड आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामाच्या निमित्ताने आले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय व त्यांची मुले असल्याने या परिसरात एकच इयत्ता चौथीपर्यत जिल्हा परिषद शाळा आहे.
दरम्यान, कोरेगाव मूळ येथील उद्योजक नागरिकांनी आजतागायत ५० लाख रुपये व त्यापेक्षा जास्त किमतीचे साहित्य हे शाळेला दान स्वरुपात दिले आहे. यामध्ये शाळेसाठी वापरण्यात येणारे मार्बल, फरशी, सिमेंट, किचनशेडचे बांधकाम, लाईट फिटिंग, रोख रक्कम, आदी ५० लाख व त्यापेक्षा जास्त किमतीचे साहित्य रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात आले आहे.
याबाबत बोलताना कोरेगाव मूळ येथील प्रभारी सरपंच वैशाली सावंत इनामदार म्हणाल्या, “जिल्हा परिषद शाळेत गोरगरीब नागरिकांची मुले शिकत आहेत. या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळा झाली तर गोरगरीब नागरिकांबरोबर ग्रामस्थांच्या मुलांनाही या शाळेचा फायदा होणार आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा, दळणवळणाच्या सुविधा आहेत. त्यामुळे या सेमी ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळा करण्यासाठी सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत.”
याबाबत बोलताना इनामदारवस्ती येथील अशोकबापू सावंत इनामदार म्हणाले, “कोरेगाव मूळ गावात मोठ्या प्रमाणात नर्सरी व्यवसाय केला जातो. त्यामुळे या ठिकाणी आलेले नागरिक हे कामधंद्याच्या निमित्ताने इतर जिल्ह्यातून, राज्यातून आलेले आहेत. त्यांची परिस्थिती हालाकीची आहे. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची मुले चांगल्या शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळा सुरु होणे ही काळाची गरज बनत चालली आहे.”
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते धनंजय शितोळे म्हणाले, “आजच्या काळात इंग्लिश मीडियम शाळा या काळाची गरज बनत आहेत. इंग्लिश मीडियम खाजगी शाळांचा आर्थिक भार हा सर्वसामान्य नागरिकांना पेलवणारा नाही. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे तसेच स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत टिकायचे असेल तर या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळा सुरु करण्यात यावी. त्यामुळे गरीब बाहेरून आलेल्या नर्सरी कामगारांच्या व साठनिक नागरिकांच्या मुलांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळेल”.