Rahul Narvekar : राज्य सरकारने बहुमताचा आकडा सभागृहात सिद्ध केला आहे. सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये,असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लगावला आहे. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार असून विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे देखील राहुल नार्वेकर म्हणाले. (MLA Disqualification)
आताच्या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. राज्यघटनेनुसार निवडून आलेले सरकार पडेल, अशी भविष्यवाणी करणे घटनेच्या तरतुदीच्या विरोधात आहे, असे मला वाटते. घटनेतील तरतुदीनुसार विधानसभा अध्यक्ष म्हणून मी योग्य तो निर्णय घेणार, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देत आहे, असे स्पष्ट मत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज व्यक्त केले. ते आज सावंतवाडीत आपल्या निवासस्थानी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.(Rahul Narvekar)
आमदार अपात्रत्रेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहचणार नाही. विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.