पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आपल्या नातवंडांना भेटण्यासाठी आलेल्या बहिणीला भावाने नातवांना भेटायचं असेल तर दीड कोटीं खंडणी मागितली आहे. जर पैसे दिले नाही तर धारावी झोपडपट्टीमधील पोरांना आणून जीवे मारण्याची देखील धमकी बहिणीला दिली. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी डी पी रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. (pune Crime News)
याप्रकरणी सुरेश पांडुरंग शिंदे आणि एक महिला (रा. शास्त्रीनगर, धारावी, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आजीने शनिवारी 25 नोव्हेंबरला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Talegaon Dabhade Police)
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचा विवाह फिर्यादीच्या लहान भावाच्या मुलीसोबत झाला असून त्यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांना घेऊन फिर्यादी यांची सून सध्या वडिलांकडे राहत आहे. त्यामुळे मुलांना भेटण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी फिर्यादी त्यांचा घरी गेल्या होत्या.
यावेळी त्यांच्या भावाने नातवांना भेटायचे असेल आणि त्यांना पुन्हा आपल्या घरी घेऊन जायचे असेल तर दीड कोटी रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी मागितली. तसेच पैसे दिले नाहीत तर धारावीची पोरं आणून तुला मारून टाकतो, अशी धमकीही दिली अशी फिर्यादी वृद्ध महिलेनी दिली आहे. तसेच फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.