हिंगोली : भुजबळ म्हातारा झाला म्हणतो. अरे बाबा हो! झालोय म्हातारा, सर्वच म्हातारे होणार आहेत. तुझे आई वडील देखील म्हातारे असतील. तूसुद्धा म्हातारा होशील, पण माझ्या डोक्याचे जेवढे केस पिकले आहेत ना, तेवढे आंदोलन आम्ही केले आहेत. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. आंदोलन माझ्यासाठी नवीन नाहीत.
दोन्ही बाजूने अडचणीत आणले जात आहे. एकीकडे कुणबी आरक्षण द्या हे सुरू आहे. त्यातच दुसरीकडे बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आणि ओबीसींचं आरक्षण काढून घ्या म्हणत आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले, ते हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेत बोलत होते, यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. (OBC Reservation)
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दोघेही सातत्याने एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर देत जरांगे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.(Chagan Bhujbal)
ते म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. आपला विरोध दाखवण्यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभरात सभा घेण्यात येणार आहे. यासाठी पहिली सभा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झाली, तर दुसरी सभा आज हिंगोलीत होत आहे. असेही भुजबळ म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, मी काही बोललो की महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना वाटतं दोन समाजात तेढ निर्माण करत आहे. त्याच्या 15 सभा झाल्यावर, आमची एकच सभा होत आहे. भुजबळ यांचा खुटा उपटून म्हणतो, मी काय केलं खुटा उपटायला. आम्हाला रोज शिव्या दिल्या जात असून आम्ही कधी एक टायर जाळला आहे का? त्यांनीचं पेटवलं आहे, असं म्हणत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर चांगलीच तोफ डागली.
नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील
अहमदनगर येथील शेवगावमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, टोळी मुकादम म्हातारा झाला तरी त्याची खूप गडबड चालू आहे. त्यांना तंबी देणाऱ्या अजित पवारांना माझं सांगणं आहे की ते शांत बसले नाहीत तर मीही शांत बसणार नाही.(Manoj Jarange Patil)