Pune Water Crisis : कोंढवा : पुण्यात सध्या काही भागात नागरिकांना पाणी टंचाईची झळ पोहोचत आहे. यात कोंढवा-येवलेवाडी परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. पाणीटंचाई असताना टिळेकरनगरमधील अवैध नळजोडणीमुळे पाण्याची गळती होत आहे. शनिवारी या पाणीगळतीमुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला होता. नागरिकांना पाणीपुरवठा सुरळित होत नसताना मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर पाणीगळती होत आहे.
परिसरात पाणीसंकट निर्माण झाले असून नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. अशातच कोणत्याही ठिकाणी होत असलेली पाणीगळती थांबविल्यास आपोआप पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी होत असलेल्या पाणीगळतीबाबत नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी मोठ्या प्रमाणांवर नाराजी असून अशा प्रकारची गळती थांबवायला हवी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, संबधित ठिकाणांची पाहणी केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येतील. तसेच कारवाई करुन त्वरित ही पाणीगळती थांबिवण्यात येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.खूपवेळा महापालिकेच्या व्हाट्सअप क्रमांकावर आणि ऑनलाईन तक्रार करुनही काहीही कारवाई होताना दिसत नाही. प्रशाससनाकडून अशावेळी दखल घेवून दंड करत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.