संदीप टुले
Pune prime News : सध्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणच्या लढ्यामध्ये मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने कडाडून विरोध दर्शवला असून या मुद्यावरून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण झालेले पाहायला मिळते. त्यात प्रत्येक तालुक्यात आता ओबीसी नेते पक्ष चिन्ह बाजूला ठेऊन एकत्र येत आघाड्या संघटना उभारताना दिसत आहेत. त्यातीलच एक दौंड तालुक्यातील ओबीसी समाजातील नेते मंडळी एकत्र येऊन ओबीसी पर्व आणि बहुजन सर्व अशी संघटन स्थापन करून गावोगावी बैठक घेत असून त्यांना चांगला प्रतिसाद ही मिळत आहे.
या संघटने असाच एक प्रयोग तालुक्याचे मिनी शहर म्हणून ओळख असणाऱ्या केडगाव ग्रामपंचायतमध्ये केला आणि यशस्वी ही करून दाखवला. अशाच प्रयोगाची गरज असल्याचे म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका प्रसार माध्यमांच्या मुलाखतीमध्ये शनिवार दि. 25 रोजी कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, 13,500 मते असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असताना ओबीसी महिला सर्वात जास्त मतांनी निवडून आली आणि सरपंच झाली. या कौतुकाने मात्र दौंड तालुक्यातील ओबीसी नेत्यांना मात्र नवसंजीवनी मिळाली आहे. खर तर हा पॅटर्न दौंड तालुक्यात पहिल्यांदाच राबवला गेला असल्यामुळे याची चर्चा मात्र राज्यभर झाली.
नेमका आघाडी चा पॅटर्न काय?
केडगाव हे दौंड तालुक्यातील एक सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. तसेच येथे जवळपास 13500 मतदान आहे. यामध्ये मराठा, माळी, धनगर, मुस्लिम, तसेच इतर समाजाची मते ही निर्णायक आहेत. यामध्ये यावेळी कुल गटाचा एक पॅनल, थोरात गटाचा एक पॅनल तसेच ओबीसी समाजांचा केडगाव विकास आघाडी म्हणून एक पॅनल अशी ग्रामपंचायत मध्ये तिरंगी लढत झाली.
यामध्ये केडगाव विकास आघाडीने माळी, धनगर, मुस्लिम तसेच इतर मागास प्रवर्गातील मतदारांना एकत्र करून ही आघाडी उभी केली. विशेष म्हणजे समोर आजी माजी आमदारांचे पॅनेल उभे होते. या केडगाव विकास आघाडीमध्ये तालुका पातळीवरील एकही नेता साथीला नसताना ५ सदस्य पदाचे आणि महत्वाचे सरपंच पदाचा उमेदवार निवडून आणला व केडगाव सारख्या मोठ्या गावावर सत्ता स्थापन केली. आणि या पॅटर्न ची चर्चा दौंड तालुकाभर गाजली. तसेच केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा दाखला शेजारील तालुक्यातील ओबीसी नेतेआपल्या आपल्या तालुक्यात देऊ लागले.
आमच्या पॅटर्न ची चर्चा आज राज्य पातळीपर्यंत पोहचली असून भुजबळ साहेबांनी आमचे कौतुक केल्याने आम्ही अजून जोशाने काम करणार आहोत. केडगाव चा निकाल ही फक्त सुरुवात आहे. हाच पॅटर्न आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राबवणार आहोत आम्ही समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत काम करणार आहोत व त्यांच्या न्याय हक्कासाठी कायम लढणार आहोत.
बाळासाहेब कापरे
केडगाव विकास आघाडीचे प्रमुख