Abhyudaya Bank : मुंबई : रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ 12 महिन्यांसाठी बरखास्त केले. आरबीआयच्या या कागिरीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कारण अभ्युदय बँकेच्या कारवाईत कुरघोडीच राजकारण असल्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार सीताराम घनदाट अभ्युदय बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे आता ही राजकीय कुरघोडीची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
सीताराम घनदाट-उद्धव ठाकरे यांची भेट
सीताराम घनदाट यांचे चिरंजीव संदीप घनदाट हे अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहेत. परिवाराकडून काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. 2009 मध्ये परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष निवडून आले होते. 2020 साली सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याशिवाय बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी आरबीआयने एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची “प्रशासक” म्हणून नियुक्ती केली आहे.
सहकारी बँकांमधील महत्त्वाची बँक
आरबीआयकडून बँकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत. ग्राहकांना त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, 31 मार्च 2020 पर्यंत, बँकेकडे 17.30 लाखांहून अधिक ठेवीदार आहेत आणि एकूण ठेवी रु. 10,838 कोटी आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 12.60 टक्के होते. बँकेच्या संकेतस्थळावर 2020 नंतरची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही.
सेंट्रल बँकेने प्रशासकांना कर्तव्याचे पालन करण्यास मदत करण्यासाठी “सल्लागारांची समिती” देखील नियुक्त केली आहे. “सल्लागारांच्या समितीच्या सदस्यांमध्ये व्यंकटेश हेगडे (माजी महाव्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया), महेंद्र छाजेड (चार्टर्ड अकाउंटंट) आणि सुहास गोखले (माजी एमडी, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.) यांचा समावेश आहे.